पुणे : बाबा सिद्दिकी हत्येवर सोशल मीडियावर भाष्य केल्याने एका समाजसेवकाला जीवे मारण्याची धमकी फेसबुकवर देण्यात आली आहे. याबाबत ४० वर्षीय समाजसेवकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमीत दादा घुले पाटील नावाच्या बनावट फेसबुक अकाऊंट धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे उद्दिष्ट प्रेरणा ग्रुप नावाने सामाजिक संस्था चालवितात. त्यांची महाबळेश्वर येथे कार केअर व वॉशिंग सेंटर आहे. बाबा सिद्दिकीची यांची हत्या झाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यानंतर आरोपी पकडल्यानंतर हा हल्ला लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट केली. त्यात या खूनामागील मास्टर माइंड यांना पकडून त्यांनाही शिक्षा व्हावी, असे म्हटले होते. या पोस्टवर सुमीतदादा घुले पाटील या नावाच्या बनावट फेसबुक अकाऊंटवरुन कोणती तरी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा लॉरेन्स बिश्नोई या आतंरराष्ट्रीय टोळीचा हस्तक असण्याची दाट शक्यता असल्याचा संशय व्यक्त केला आहे. स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे तपास करीत आहेत.
