पुणे : पुण्यात समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ‘ग्राइंडर ॲप’च्या माध्यमातून ओळख करून आमिष दाखवून निर्जनस्थळी नेवून मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढून घेण्याची घटना १८ मार्चला सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आरटीओ चौकानजीक घडली होती. याप्रकरणी आता बंडगार्डन पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी बाहीद रज्जाक उर्फ लालसाहब शेख (वय १९ वर्षे, रा. मंगळवार पेठ, जुनाबाजार), महेबुब ऊर्फ गौरा जावेद शेख (वय २० वर्षे, रा. मंगळवार पेठ), श्रीनिवास ऊर्फ शिनु व्यंकप्पा नायक (वय २२ वर्षे, रा.शिवाजी आखाडा समोर, मंगळवार पेठ) आणि सोहेल गफुर शेख (वय २४ वर्षे, रा.शिवाजी आखाडासमोर, मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका ३८ वर्षीय व्यक्तीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय व्यक्तीच्या फिर्यादिवरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलीस अधिकारी गुन्ह्याचा तपास करीत होते. पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकर यांना गुप्त बातमीदाराकडून आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी चारही आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोख रक्कम हस्तगत केली. सदरची कारवाई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रविणकुमार पाटील , उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ निरीक्षक रविंद्र गायकवाड, निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, मोहन काळे, प्रदिप शितोळे, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, महेश जाधव, शिवाजी सरक यांच्या पथकाने केली.
