पुणे : मैत्रिणीशी बोलु दिले नाही, या कारणावरुन एका मुलाने तरुणाच्या डोक्यात पाईपने मारुन जखमी केले. त्याला सोडविण्यासाठी आलेल्या आईच्या डोक्यात दगड मरुन जखमी केले. याबाबत वैभव श्रीमंत सोनवणे (वय २३, रा. इंद्रलोक अपार्टमेंट, आनंदनगर, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्याच सोसायटीतील एका मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फिर्यादीच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मैत्रिणीशी बोलत होते. त्यावेळी आरोपी मुलगा तेथे आला. परंतु, फिर्यादी यांनी त्याला मैत्रिणीशी बोलु दिले नाही. हा राग मनात ठेवून रात्री हा मुलगा फिर्यादीच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये आला. तेथील पाईप घेऊन त्याने वैभवच्या डोक्यात पाईपाने मारले. ही भांडणे सोडविण्यासाठी मैत्रिण आली असता तिला बाजूला ढकलून दिले. जखमी मुलाला सोडविण्यासाठी त्याची आई आली असताना त्याने तिच्या डोक्यात दगड मारला. वडिलांच्या डाव्या हाताच्या मनगटावर दगडाने मारुन जखमी केले. भांडण्यात फिर्यादीच्या मोबाईलचे नुकसान केले. पोलीस हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.
