पुणे : गेल्या वर्षी तत्कालीन पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए कारवाई करुन तुरुंगात टाकलेल्या अट्टल गुन्हेगाराने बाहेर येताच धमकावणे सुरु केले. त्याच्याविरुद्ध तक्रार करणार्या रिक्षाचालकाला मला जेलमध्ये टाकून तू येथे निवांत राहणार आहे का असे म्हणून लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रिक्षाचालक अनिल बाळासाहेब मलंगनेर (वय ३३, रा. काळे पडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद तुळजाराम बंदिछोडे (वय २७, रा. वैभव टॉकीज मागे, कामठे वस्ती, हडपसर) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. हा प्रकार हडपसरमधील कामधेनू इमारतीसमोर गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडला होता. विनोद बंदिछोडे याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, दुखापत यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून हडपसर परिसरात तो आपली दहशत निर्माण करुन होता. मागील ५ वर्षात त्याच्यावर ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी गेल्या वर्षी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली होती. त्याला गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध केले होते. तेथून तो नुकताच सुटून आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहे. त्यांनी जुन्या वादातून विनोद बंदिछोडे याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्या तक्रारीचा राग मनात धरुन “मला तू जेलमध्ये टाकून तू येथे निवांत राहणार आहे का” असे म्हणून त्याने हातातील लाकडी दांडक्याने अनिल यांच्या पायावर मारुन जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीची पत्नी व इतर लोक सोडविण्यासाठी आले असता त्याने त्याच्या हातातील लाकडी दांडका हवेत फिरवून कोणी मध्ये आला तर पहा अशी धमकी दिली. हवेत दांडका फिरवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. विनोद बंदिछोडे हा पळून गेला असून पोलिसांनी दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार बनसुडे तपास करीत आहेत.