पुणे : विहित वेळेपेक्षाही जास्त वेळ चालू असणाऱ्या पबवर कारवाई करावयास गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पब मालकाने आणि व्यवस्थापकाने पोलीस आयुक्तांच्या नावाने धमकी दिली. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने पब चालु ठेवला आहे, तुम्ही आम्हाला त्रास दिल्यास पोलीस आयुक्तांना फोन करुन तुमची तक्रार करु’ असे म्हणत त्यांना कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पब मालक आणि व्यवस्थापकावर येरवडा पोलिसांनी कारवाई केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेश बाबुराव लामखेडे(वय ३७ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार पब मालक हेरंब शेळके(वय ४० वर्षे) आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २२१, २२३, ३(५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३३ आ/डब्ल्यु १३१ ही कलमे लावण्यात आली आहेत. शहरातील सर्वात मोठा पब ‘बॉलर’ चे हेरंब शेळके हे मालक आहेत. या पबवर पार्शेकार अपघातानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. येरवडा पोलीस ठाण्याचे रात्रगस्तीवरील अधिकारी महेश लामखेडे सोमवारी रात्री परिसरातील अस्थापना तपासण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना रात्री दोन वाजता बॉलर हा पब सुरु असल्याचे आढळले. पबमध्ये तब्बल ५०० ते ६०० ग्राहकांना खाद्यपान, मद्यपान अशा सेवा पुरविण्यात येत होत्या. लामखेडे यांनी मालक शेळके आणि व्यवस्थापकास पब बंद करण्यास सांगितले. मात्र त्यांनी उलट पोलीस आयुक्तांनीच आम्हाला परवानगी दिली आहे, तुमचीच त्यांच्याकडे तक्रार करु असा दम भरत हुज्जत घातली. यानंतर पब बंद करण्यास अटकाव केला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
