पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयाच्या टेरेसवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने, एकच खळबळ उडाली. टेरेसवर आढलेला मृतदेह रुग्णाचा होता की रुग्णाच्या नातेवाईकाचा होता की बाहेरची व्यक्ती होती, याबाबत अद्यापही काहीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. घटनास्थळावर लष्कर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी भेट देऊन, त्या व्यक्तीचा मृतदेह पोलिसमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र, या घटनेमुळे पटेल रुग्णालयातील सुरक्षितताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून अद्यापही काहीही स्पष्टीकरण आलेले नाही. पटेल रुग्णालयाच्या टेरेसवर काही झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे साफसफाईसाठी रुग्णालायचे काही कर्मचारी सोमवारी (ता.२१) सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांना टेरेसवर दुर्गंधी येऊ लागली. कर्मचार्यांनी पाहिले तर त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. कर्मचार्यांनी तात्काळ रुग्णालयाच्या वैद्यकिय निवासी अधिकारी डॉ. उषा तपासे आणि अन्य डॉक्टरर्स तसेच कर्मचार्यांना ही घटना सांगितले. रुग्णालय प्रशासनातर्फे तात्काळ लष्कर पोलिस स्टेशनला ही घटना कळविली. प्रत्यक्ष घटनास्थळी पोलिस आल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. परंतू, ती व्यक्ती कोण होती. रुग्ण होती की, एखाद्या रुग्णाची नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती होती. याबाबत काहीच माहिती नसल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मृतदेहाच्या बाजूला एक बाटली आढळून आली. त्या व्यक्तीने आत्महत्या केली की अन्य काही प्रकार त्या व्यक्तीच्या बाबतीत घडला. याबाबतचेही उत्तर रुग्णालय प्रशासन देऊ शकलेले नाही.
