<a
पुणे : शाळेत गेलेल्या मुलाली आणण्यासाठी अॅक्टीव्हा गाडीवरून जाणाऱ्या महिलेस आडवून तिचा विनयभंग करून मारहाण केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम बाबुराव गावडे (वय ५५ वर्षे, रा. थेऊर ता. हवेली) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला शनिवारी दुपारी एकच्या सुमारास आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी अॅक्टीवा गाडीवरून जात होती. यावेळी सुदाम गावडे याने टेम्पो चालवत पीडित महिलेचा पाठलाग केला. थेऊर ते कोलवडी रोडवर कल्पतरु बागे समोर अॅक्टीव्हा गाडीच्या आडवा टेम्पो लावत पीडितेला थांबवले. त्यानंतर त्याने पीडितेचा हात धरत "तू मला खूप आवडतेस, तू मला हवी आहेस" असे म्हणत तिचा विनयभंग केला. पीडितेने हात झटकल्यानंतर त्याने तिचा हात पिरगळुन हाताने मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्याने पीडितेच्या पोटामध्ये लाथाने मारहाण केली तसेच केसांना धरुन रस्त्यावर खाली पाडले. "तू मला कशी हा म्हणत नाही, तेच बघतो" पीडितेचे कपडे फाडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडा ओरड केल्यानंतर इतर लोक जमा झाल्याने पीडितेला शिवीगाळ करुन "तुला व तुझ्या नव-याला, मुलींना बघून घेतो" अशी धमकी देवून गावडे निघून गेला. त्यानंतर पीडितेने घडलेल्या प्रकाराची लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
