पुणे : बस विकत घेतल्यानंतर कर्जाचे हप्ते भरले असतानाही ते थकीत असल्याचे खोटे सांगून फायनान्स कंपनीच्या अधिकार्यांनी जबरदस्तीन बस ओढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पंकज मारुती बनसोडे (वय ४२, रा. बुधवार पेठ, सोलापूर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बसचा मुळ मालक विजय दत्तात्रय कदम (रा. तडवळे, वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा), कुणाल विजय चौगुले (वय ३९, रा. पर्वती पायथा, चौगुलेवाडा), आरबीएसजी कॅपिटल फायनान्सचे अधिकारी अजय कुडवे आणि त्यांचा साथीदार अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विजय कदम यांच्या मालकीची बस रीतसर खरेदी करारनामा करुन विकत घेतली. करारनाम्यानुसार गाडीमालक विजय कदम यांना ७ लाख ४७ हजार रुपये व प्रत्येक महिन्याला गाडीच्या कर्जाचा हप्ता ३० हजार ५१७ रुपये असे मिळून ३ लाख ५ हजार १७९ रुपये भरले होते. त्यानंतर शनिवारी दुपारी १२ वाजता स्वारगेट येथील व्हॅल्गा चौकात बस प्रवासी घेण्यासाठी लावलेली होती. त्यावेळी आर बी एस जी फायनान्स कंपनीचे अधिकारी अजय कुडवे यांनी गाडीच्या कर्जाचे हप्ते थकीत असल्याचे खोटेच सांगितले. बसचालक आकाश लांडगे यांच्याकरुन जबरदस्तीने बस घेऊन विजय कदम, कुणाल चौगुले व त्यांचा साथीदार निघून गेले. विजय कदम याने संगनमताने हे करुन १० लाख ५२ हजार १७० रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक शिरसट तपास करीत आहेत
