पुणे : भीक मागण्याचा बहाणा करुन उघड्या दरवाजावाटे घरात शिरुन चोरी करणार्यांना चंदननगर पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ४० लाख ७६ हजार ६०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे. मिली दीपक पवार (वय २०, रा. आडगाव नाका झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून तिच्याबरोबरील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. चंदननगरमध्ये उघड्या दरवाजावाटे घरात शिरुन सोने व रोख रक्कम चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता. चोरीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे लाल रंगाचा चारचाकी टेम्पोसारख्या गाडीचा व चोरी करणारे महिला व एका व्यक्तीची माहिती चंदननगर पोलिसांनी प्राप्त झाली होती. सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर हे तपास पथकातील अंमलदारांसह पेट्रोलिंग करत होते. त्या दरम्यान, पोलीस हवालदार नाणेकर यांना बातमी मिळाली की मागील दोन -तीन महिन्यांपूर्वी पैसे व सोने चोरी करणार्या फुटेजमधील वर्णनासारखी महिला व व्यक्ती हे आळंदी देवाची येथे एका लाल रंगाच्या चारचाकी टेम्पोसारख्या गाडीसह उभे आहेत. या माहितीनुसार पोलीस आळंदी देवाची येथे रवाना झाले. त्यांनी मिली पवार व तिच्याबरोबरील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे सोने व पैसे मिळून आले. त्याबाबत चौकशी केल्यावर टिंबर मार्केट येथे १८ ऑगस्ट रोजी एका घरातून चोरी केल्याचे सांगितले. त्याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. तिला अटक केल्यानंतर अधिक चौकशीत ३ महिन्यांपूर्वी चंदननगर येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३५ लाख रुपयांचे ५२ तोळे वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने तसेच २६ हजार ६०० रुपये रोख व ५ लाख ५० हजार रुपयांचा महिंद्रा ईम्पोरिओ कंपनीची चारचाकी गाडी असा एकूण ४० लाख ७६ हजार ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे निरीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, प्रफुल्ल मोरे, सचिन पाटील, विकास कदम, अमोल जाधव, शेखर शिंदे, नामदेव गडदरे, सुरज जाधव, श्रीकांत कोंद्रे, ज्ञानोबा लहाने, शितल वानखेडे, पुजा डहाळे, मनिषा पवार यांनी केली आहे.
