पुणे, प्रतिनिधी | मुख्य संपादक : नितीन वायदंडे
खतिजा शहाबुद्दीन शेख (वय १९, रा. कौसरबाग, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती सध्या पुण्यात शिक्षण घेत असून, तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर “पाकिस्तान जिंदाबाद” असा मजकूर पोस्ट करण्यात आला होता. या प्रकाराची माहिती सकल हिंदू समाज या संघटनेने दिल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.
प्रकरणाची गंभीर दखल घेत कोंढवा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तरुणीला ताब्यात घेतले. तिच्या विरोधात भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि धार्मिक सलोख्याला धोका निर्माण करणाऱ्या कृत्याबद्दल विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे म्हणाले, “कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवतीने पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.”
सध्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत असून, या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.
