पुणे : तडीपार केले असतानाही शहरात येऊन साथीदारासह मंगळवार पेठेत कोयते उगारुन मोठ मोठ्याने ओरडून आम्ही इथले डॉन असून आमच्या नादाला कोणी लागले तर सोडणार नाही,अशी धमकी देऊन गोंधळ घातला. प्रतिक विजय माने (वय २३, रा. कुंजीर वस्ती, मांजरी) आणि आकाश ज्ञानेश्वर तानवडे (वय २३, रा. जहांगीर नगर, मुंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार चेतन दत्तात्रय होळकर यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील भिमनगर कमानजवळ गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक विजय माने हा सराईत गुंड आहे. त्याच्या वाढत्या गुंडगिरीमुळे त्याला पोलीस उपायुक्त आर राजा यांनी १३एप्रिल २०२४ पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून दोन वर्षांपासून तडीपार केले आहे. तरीही तो तडीपारी आदेशाचा भंग करुन पुणे शहरात आला. आपला साथीदार आकाश तानवडे याच्याबरोबर मोटारसायकलवरुन हातात कोयता घेऊन मोठ मोठ्याने ओरडत रात्री साडेअकरा वाजता मंगळवार पेठेतील भिमनगर कमान येथे आला. त्याने मोठमोठ्याने ओरडून ‘आम्ही इथले डॉन असून आमच्या नादाला कोणी लागले तर त्याला सोडणार नाही,’ अशी धमकी देऊन परिसरात दहशत पसरविली. पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करीत आहेत.