<a
पुणे : वयोमानानुसार त्यांचे आपल्या शरीरावरील नियंत्रण सुटले होते. त्यामुळे त्यांना नित्यकर्म करतानाही त्रास होत होता. पण हे लक्षात न घेता शेजारी राहणार्या पुरुषाने त्यांच्यावर आरडाओरडा करुन हाताने मारहाण केली. मानेला पकडून त्यांचे डोके भिंतीला आपटल्याने त्यांचे डोके फुटून जखम झाली. याबाबत हडपसरमधील वैदुवाडी येथील एका ७६ वर्षाच्या वृद्धाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या संतोषकुमार यादव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बाथरुमला लागल्याने बाथरुमला गेले होते. परंतु, तोपर्यंत त्यांना कंट्रोल न झाल्याने पँटमध्येच शौचाला झाली. त्यानंतर ते स्वत:ची पँट धुवून घरी आले. त्यांच्या शेजारी राहणार्या संतोषकुमार यादव याने मोठमोठ्याने आरडा ओरडा सुरु केला. त्याचा आवाज ऐकून फिर्यादी हे परत खाली गेले. तेव्हा त्याने तुम्ही बाथरुममध्ये खुप घाण केली. तुम्हाला समजत नाही का, असे म्हणून फिर्यादींना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यांच्या मानेला पकडून डोके भिंतीला आपटल्याने त्यांचे डोके फुटून डोक्यातून व नाकातून रक्त येऊ लागले. तेव्हा त्यांच्या मुलाने ससून रुग्णालयातून त्यांच्यावर उपचार केले. १४ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला होता. हडपसर पोलिसांनी दुसर्या दिवशी गुन्हा दाखल केला. त्यानंतर ही हद्द वानवडी पोलीस ठाण्याची येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी गुन्हा वानवडी पोलीस ठाण्याकडे हस्तांतरीत केला आहे.
