मित्रांमध्ये खूप वेळा चेष्टा मस्करी होणे काही नवीन नाही. मात्र, चेष्टा मस्करी केल्यामुळे मित्राला बेदम मारहाण करुन तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील रामटेकडी परिसरात घडली आहे. ही घटना २७ मे रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजता च्या दरम्यान रामटेकडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
मंगेश मधुकर बामणे (वय-३६ रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर राजु शितोळे (वय-२५), रोहित ज्ञानेश्वर गायकवाड (वय-२५), विशाल राजु शितोळे (वय-२८) आकाश जयसिंग चव्हाण (वय-२१ सर्व रा. स.नं. १०६, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) यांच्यावर आयपीसी ३०२,३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत यमुना मधुकर बामने (वय-५५) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी यांचा मुलगा मंगेश एकमेकांचे जवळचे मित्र आहेत.
२७ मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मंगेश आणि त्याचे मित्र व्हि मॅक कंपनीसमोरील रोडवर
टेकडीच्या पायथ्याला गप्पा मारत थांबले होते. त्यांच्यामध्ये चेष्टा मस्करी सुरु होती.
आरोपींनी संनमतकरुन मंगेश सोबत चेष्टा करण्यास सुरुवात केली. त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर मारहाण केल्याने मंगेश गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.
वानवडी पोलिसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.
