वपुणे शहरात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण व्यवस्थित समतोल न झाल्याने व काही अंशी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पुणे
महानगरपालिकेला सुविधा पुरवण्यात अपयश
आल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात ज्या ठिकाणी पाणी साचत आहे अशी ठिकाणे शोधून त्याठिकाणी त्वरीत उपाय योजना करावी, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवदनाद्वारे केली आहे.
संदीप खर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शहरातील अनेक भागात थैमान उडवले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे व नागरिकांना त्रास सहन करावा लागलात आहे. यामुळे नाले सफाई, पावसाळी लाईन व ड्रेनेज लाईन (गटार) सफाई चे वास्तव तर उघडे पडलेच पण त्याच बरोबर अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण व्यवस्थित समतोल न झाल्याने व काही अंशी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे तळं साचलेले दिसले. येथे पाण्याचा निचरा होण्यास २ते ३ दिवस लागले. तरी शहरातील अशी ठिकाणं शोधून तेथे त्वरित उपाययोजना केल्यास येणारा पावसाळा पुणेकरांना सुखावह जाईल.
तसेच गत वर्षी अश्याच पडलेल्या मुसळधार पावसाने (अवघ्या काही तासात) शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.
कर्वेनगर/एरंडवणे भागात तर अनेक इमारतीत पाणी शिरले व स्वतः आयुक्त विक्रमकुमार यांना सर्व अधिकाऱ्यांसमवेत
रात्री उशिरापर्यंत येथे थांबून रहावे लागले व स्वतः पाणी निचऱ्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्या लागल्या.
त्यावेळी ही त्रुटी लक्षात आली की पाणी निचरा करण्यासाठी प्रशासनाकडे पुरेशी साधने नव्हती/पंप नादुरुस्त होते व येवढे
पाणी उपसण्याची त्यांची क्षमता नव्हती.
तरी खालील मागण्या करत आहे, त्याची दखल घेऊन सकारात्मक पावले उचलला अशी खात्री वाटते…
आपत्ती व्यवस्थापने साठी लागणारी सर्व साधन सामग्री सर्व क्षेत्रीय कार्यालयात त्वरित उपलब्ध करावी.
तसेच एका संस्थेने (बहुधा प्रायमूव्ह) शहरातील सर्व पावसाळी व ड्रेनेज लाईन्स चे मॅपिंग केले आहे.
त्याचा अभ्यास करावा म्हणजे ऐन वेळी कुठे पाणी अडकले आहे हे शोधत बसण्याची नामुष्की टाळता येईल.
शासनाने काही ठिकाणी नाल्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे, नाल्यांची सफाई, खोलीकरण, रुंदीकरणासाठी निधी मंजूर
केला असून सदर निधी प्राप्त झालाय का व त्याचा विनियोग कसा करत आहात याचा तपशील जाहीर करावा.
तसेच नालेसफाई वेगात पूर्ण करावी व त्याचा अहवाल त्रयस्थ संस्थेमार्फत मागवावा म्हणजे वर्षानुवर्षे नालेसफाई, ड्रेनेज
व पावसाळी लाईन सफाई चा कोट्यावधीचा निधी पाण्यात तर वाहून गेला नाही ना ह्या पुणेकरांच्या शंकेचे निरसन होईल.
