पुणे : दिवाळीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दुकानदार सेल आयोजित करतात. या सेलसाठी ग्राहकांची होणारी गर्दी पाहून चोरटेही सावज टिपण्याचा प्रयत्न करतात. अशीच पैठणीच्या खरेदीसाठी होत असलेली गर्दी पाहून मुलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्या दोघा महिलांनी पोलिसांनी अटक केली आहे. रेणुका पवार (वय ३०, रा. शिवाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) आणि संगिता अंकुश सुकुळे (वय ४५, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा पुरुष साथीदार पळून गेला आहे. याबाबत आंबेगाव बुद्रुक येथील एका २७ वर्षाच्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौकातील मुळचंद मील या दुकानासमोर शनिवारी दुपारी २ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलबाग चौकातील मुळचंद मील या दुकानदाराने पैठणीचा सेल सुरु केला आहे. या दुकानात महिलांची मोठी गर्दी होत आहे. फिर्यादी या दुकानासमोर फुटपाथवर थांबल्या असताना फिर्यादी यांच्या मुलाच्या तसेच आणखी एका मुलाच्या गळ्यातील सोन्याचा ओम व सोनसाखळी चोरुन नेत असताना दोघींना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. हवालदार भुजबळ तपास करीत आहेत.
