अहिल्यानगर : अहिल्यानगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं असून एका माथेफिरू दिरानेच आपल्या भावजयांची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. सोमवारी (ता. ७) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहे. अकोले तालुक्यातील बेलापूर गावात हा हत्येचा थरार घडला आहे. दत्तात्रय प्रकाश फापाळे असं आरोपीचं नाव आहे. तर उज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे असं हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत. किरकोळ पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथामिक माहिती आहे. भावजयांची हत्या केल्यानंतर आरोपी गावातून हातात कोयता घेऊन फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे हा अकोले तालुक्यातील बेलापूर गावातील रहिवासी आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास पैशांच्या किरकोळ वादातून आरोपीचा आपल्या भावजयांसोबत वाद झाला. क्षणार्धात या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपीने कोयता आणून भावजयांवर सपासप वार केले. या घटनेत उज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे या गंभीर जखमी झाल्या. आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीला आले. तेव्हा आरोपी हा घटनास्थळावरुन फरार झाला. दरम्यान, स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अकोला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दोन्ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून जखमी असलेल्या महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.