पुणे : विवाहाचे आमिष दाखवून एका महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका वाहनचालकाला पोलिसांनी शनिवारी (दि. ५) अटक केली. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अक्षय सुनिल ढमाले (वय २६, रा. आंबेगाव पठार) हे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याबाबत पीडित युवतीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. हा प्रकार जुलै २०२२ पासून ३ एप्रिल २०२५ या काळात घडला. आरोपी अक्षय ढमाले हा व्हॅनचालक आहे. शाळेमध्ये मुलांना सोडण्याच्या कामातून त्याची या पिडितीशी ओळख झाली. त्याने या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढली. ती व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केले. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. यासंदर्भात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
