दिघी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत दोघांना अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. पहिली कारवाई रविवारी (दि. ३०) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर करण्यात आली. इंद्रायणी नदीच्या काठावर एका व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गिरीराज चिम्मनराम बैरवा (वय ३५, रा. आळंदी. मूळ रा. राजस्थान) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आढळले. पोलिसांनी पिस्तूल जप्त करत गिरीराज याला अटक केली. दुसरी कारवाई सोमवारी (दि. ३१) वडमुखवाडी येथील शाळेच्या पाठीमागील मैदानात करण्यात आली. केत बाळासाहेब दौंडकर (वय २३, रा. कनेरसर, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वडमुखवाडी येथील शाळेच्या पाठीमागील मैदानात एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संकेत दौंडकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
