पुणे : काहीही कामधंदा न करता दारु पिऊन त्रास देणार्या पतीला दारु पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन तिला गंभीर जखमी केले. सहकारनगर पोलिसांनी पतीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. दत्ता राजाराम अडागळे (वय ३८, रा. तळजाई वसाहत, पदमावती) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत पूनम दत्ता अडागळे (वय ३२, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, पदमावती) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३१ मार्च रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या राहत्या घरात घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूनम अडागळे आणि दत्ता अडागळे यांचा २०१५ मध्ये विवाह झाला. त्यांना अदित्य (वय ७) मुलगा आहे. लग्न झाल्यापासून दत्ता अडागळे हा काहीच काम करत नाही. त्यामुळे पूनम अडागळे याच मिळेल तिथे स्वयंपाकाचे काम, तसेच साफसफाईचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. ३१ मार्च रोजी रात्री ८ वाजता दत्ता अडागळे हा दारु पिऊन घरी आला. पूनम यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तो शिवीगाळ करु लागला. तेव्हा त्याच्याकडे लक्ष न देता त्या पाठ फिरवून दरवाजाच्या उंबरट्यात समोरील बाजुला तोंड करुन बसल्या. तेव्हा दत्ता याने घरात असलेली कुर्हाड घेऊन त्यांच्या डोक्याच्या मागच्या भागावर २ घाव घातले. त्यांच्या पटकन लक्षात आल्याने त्यांनी तो घाव चुकवला. परंतु त्याने त्यांच्या डोक्याला व हाताला जखम होऊन खुप रक्त येऊ लागले. त्यांनी आरडाओरडा केल्यावर सासु भांडण सोडविण्यासाठी आली. पोलिसांनी त्यांना १०८ रुग्णवाहिका बोलावून ससून रुग्णालयात पाठवले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक रेखा साळुंखे तपास करीत आहेत.
