पुणे : विदेशी दारुच्या बाटलीत बनावट दारु भरून त्याची विक्री करणे हा त्यांचा धंदा. पण कोणत्याही ठिकाणी या बाटल्या भरायचे काम केले तर पोलिसांची धाड पडण्याची भिती. त्यातून त्यांची चक्क महागड्या चारचाकी कारमध्ये ब्रँडेड विदेशी दारुच्या बाटल्यात बनावट विदेशी दारु भरण्याचा उद्योग सुरु केला. पण राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्याची टीप मिळालीच. अशा प्रकारे कारमध्ये बनावट उद्योग करणार्यांवर २२ व २३ जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करुन १९ लाख ३७ हजार ७८५ रुपयांचा माल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महागड्या चारचाकी गाड्या निर्जन स्थळी उभ्या करुन बनावट विदेशी दारु ब्रँडेड विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्यात भरुन नकली बुचे लावून सीलबंद करुन विक्री करण्याचा उद्योग सुरु आहे, अशी माहिती मिळाली. दौंड विभाग पथकाने राजेगाव तसेच खडकी येथे सापळा रचून दोन गुन्हे उघडकीस आणले. या दोन्ही कारवायात आतापर्यंत ३ आरोपींना अटक केली आहे. दोन्ही कारवायात दोन महागडी चारचाकी वाहने, बनावट विदेशी दारु, बनावट झाकणे असा १९ लाख ३७ हजार ७८५ रुपयांचा माल जप्त केला आहे. पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग बी राजपुत, उपअधीक्षक उत्तमराव शिंदे, सुजित पाटील, गणेश कसरे, जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, दिनेश ठाकूर, मयुर गाडे, जवान संकेत वाजे, शुभम भोईटे, अशोक पाटील प्रविण सूर्यवंशी, सौरभ देवकर, केशव वामने यांनी ही कारवाई केली निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक पुढील तपास करीत आहेत.
