पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिला ‘तू मला हो म्हण नाही तर तुझ्या तोंडावर अॅसिड टाकीन’ अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या २९ वर्षाच्या आईने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्षय (वय २३) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कर्वेनगर परिसरात १४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी शाळेला जात असताना आरोपी अक्षय हा तिला थांबवून पाठलाग करीत असे. तिच्याजवळ येऊन मी तुला रोज बघतो. मी तुला लाईक करतो, तू मला खूप आवडेतस असे म्हणत. तेव्हा या मुलीने त्यास नाही मी तुला ओळखत नाही, मला तुझ्यासोबत बोलायचे नाही, असे म्हटले. त्यावर त्याला राग आला. त्याने ‘तू मला हो म्हण नाही तर मी तुझ्या तोंडावर अॅसिड टाकीन’ अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरुन मुलीने ही घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.
