पुणे : खंडणी विरोधी पथकाने एकाच दिवशी उत्तमनगर, शिवणे येथे कारवाई करुन दोघांकडून २ पिस्टल व २ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. राहुल कृष्णा गायकवाड (वय ३८,रा. इंद्रा वसाहत, एनडीए रोड, उत्तमनगर) आणि युवराज लेकराज वर्मा (वय २९, रा. गोसाळ चाळजवळ, उत्तमनगर) अशी दोघांची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार उत्तमनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे व अमोल आवाड यांना बातमी मिळाली. त्याच्या आधारे पोलिसांनी राहुल कृष्णा गायकवाड याला पकडले. त्याच्या अंगझडतीत एक पिस्टल व एक जिवंत काडतुस असा ३५ हजार १०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील हे तपास करीत आहेत.
याच दरम्यान, पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे व पोलीस अंमलदार मयूर भोकरे यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे शिवणे येथे युवराज वर्मा याला पकडण्यात आले. त्याच्या अंगझडतीत एक पिस्टल व एक जिवंत राऊंड असा ३५ हजार १०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे करत आहेत.
