पुणे : पूर्ववैमनस्यातून एका ज्येष्ठाने तरुणाच्या डोक्यात तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत कासिम बादशाह शेख (वय ३७, रा. ओव्हेरा सोसायटी, चुडामण तालीम चौकाजवळ, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडक पोलिसांनी अन्वर युसुफ खान (वय ६०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला अटक केली आहे. वसिम शेख याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काशेवाडी येथील चमनशहा चौक येथे गुरुवारी दुपारी ३ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. फिर्यादी हे चिकन आणण्याकरीता गेले होते. त्यावेळी अन्वर खान व वसिम शेख यांनी फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अन्वर याने तलवारीने फिर्यादीच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला असता तो फिर्यादी यांनी उजव्या व डाव्या हातावर वार घेतले. त्यामुळे डाव्या हाताच्या चार बोटांना गंभीर जखम झाली. उजव्या हाताच्या पंज्यावर व अंगठ्याला गंभीर जखम झाली. फिर्यादीच्या मदतीकरीता येणार्या लोकांच्या मनात दहशत माजवून हवेत तलवार फिरवून लोकांना पळून लावले. फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करीत आहेत़.
